गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्रिपद चांगलंच चर्चेत राहिलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. आता माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यामुळे कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असतानाच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय.
हे ही वाचा...
छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना दावा केलाय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती. मात्र कृषीमंत्री या पदाला ग्रामीण भागातील व्यक्ती या पदाला जास्त न्याय देऊ शकते, अशी माझी त्यावेळी भूमिका होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. तसेच कुठलेही खाते लहान मोठे नसते. आपण काय काम करतो यावर सगळे अवलंबून असते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
हे ही वाचा...
माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेत असतात. यावर मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही. याआधी देखील अनेक नेते कृषिमंत्री राहिलेले आहेत. शरद पवार यांनीदेखील देशाचे कृषीमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे, अशा भावना यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केल्या.