बारामतीवरून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या लालपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एसटीमध्ये अज्ञात व्यक्तीकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. लालपरीमध्ये अज्ञात व्यक्तीने कोयत्याने वार केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण देखील पसरल्याचं पहायला मिळालं.
ही बस आज (१ ऑगस्ट) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास बारामतीहून इंदापूरकडे जात होती. बारामती तालुक्यातील काटेवाडी गावाजवळ असताना हा प्रकार घडला. बसच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने अचानक शेजारी बसलेल्या दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने हा हल्ला केला. तर हल्ल्यात जखमी झालेला तरुण बसमधून खाली उतरून पळून गेला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.या घटनेत हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.