
१९ जून २०२५
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून, दुपारी साडेअकरा ते अडीच या तीन तासांत तब्बल 56 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळपासून सुमारे 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे गोदावरीला पूर आला असून, सिन्नरच्या एका सराफाची गाडी गोदाघाटावर वाहून जात असताना परिसरातील नागरिकांनी मदत करून ही गाडी दोरखंडाने बांधून ठेवली. त्यामुळे वाहून जाण्यापासून ही गाडी बचावली.
गेल्या चोवीस तासांपासून शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ आहे. गोदावरी घाटावरील गांधी तलाव, रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरात पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले. शहर व उपनगरातील पावसाचे पाणी गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठावरील रहिवाशांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले. काही ठिकाणी महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलकही लावले आहेत.
नाशिक शहर आणि परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आलेल्या भाविक व पर्यटकांचे चांगलेच हाल झाले. नाशिक शहरातील गोदावरी नदीपात्रांमध्ये अस्थिविसर्जन करण्यासाठी येणार्या नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. शहरातील कामासाठी म्हणून सिन्नर येथील सराफ व्यावसायिक प्रसाद वाडेकर हे कामासाठी आलेले होते. त्यांनी या ठिकाणी गाडी पार्क केली होती; परंतु गोदावरीच्या पाण्याची पातळीदेखील वाढली. त्यामुळे त्यांची गाडी ही गोदावरी नदीच्या पुरामध्ये फसल्याने त्यांनी येथील स्थानिक नागरिकांकडे मदत मागितली आणि नागरिकांनी मदत करून ही गाडी दोरखंडाच्या सहाय्याने बांधून ठेवली. त्यामुळे ही गाडी बचावली.
भाविक आणि पर्यटकांप्रमाणेच गोदावरी घाट परिसरामध्ये असलेल्या व्यापार्यांनाही आपली दुकाने स्थलांतरित करावी लागत आहेत. यासाठी मनपा प्रशासनदेखील मदत करण्यात येत आहे.
गंगापूर धरण व लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून, दुपारनंतरही असाच पाऊस सुरू राहिला, तर गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे गोदाकाठावरील सर्व नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पुनद धरणातून 321 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यांतही पावसाचे समाधानकारक चित्र आहे.
Copyright ©2025 Bhramar