नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : घर नावावर करून देण्यासाठी सासरच्यांकडून वारंवार होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सायकिशोर ताताराव नक्का (रा. सितानागरम, आंध्र प्रदेश) यांची बहीण आशाराणी ताताराव संतोषकुमार नक्का (वय 24) ही आर्टिलरी सेंटर कॉर्नर, नाशिकरोड) येथे दि. २७ ऑक्टोबर २०२४ ते दि. ३ सप्टेंबर २०२५ या काळात सासरी नांदत होती. त्यावेळी पती संतोषकुमार नक्का (वय 25), सासरे श्रीनिवासराव नक्का व सासू जयलक्ष्मी नक्का यांनी संगनमत करून फिर्यादीच्या बहिणीचे आंध्र प्रदेश येथे असलेले घर नावावर करून देण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
विवाहिता ही मूकबधिर आहे, म्हणून तिला वेळोवेळी हिणवून मारहाण व शिवीगाळ केली. पतीसह सासू-सासर्यांकडून होणार्या छळाला कंटाळून अखेर आशाराणी नक्का या विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.