नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एका अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट विक्री करण्याचे सांगून मुंबईच्या एका इसमाने तरुणाची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फेब्रुवारी 2022 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आरोपी प्रशांत विष्णू जोशी (वय 45, रा. मालाड, मुंबई) याने आडगाव शिवारात असलेला जैनम् अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 2 व 3 विक्री करावयाचे असल्याचे फिर्यादी जयेश मन्साराम माळी (रा. जैनम अपार्टमेंट, आडगाव, नाशिक) यांना सांगितले.
त्यानुसार आरोपी प्रशांत जोशी यांनी फ्लॅट नंबर 2 चे बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत या फ्लॅटचा व्यवहार करून त्यापोटी फिर्यादीकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपीच्या नावावर असलेला फ्लॅट नंबर 3 याचादेखील व्यवहार फिर्यादीसोबत करून त्यावर असलेले ठाणे जनता सहकारी बँकेचे 18 लाख रुपयांचे कर्ज, तसेच 1 लाख 34 हजार 750 रुपयांची स्टॅम्प ड्युटीची फी अशी एकूण 19 लाख 40 हजार रुपयांची रक्कम लबाडीच्या इराद्याने व अप्रामाणिकपणे स्वीकारून फिर्यादी माळी यांची आर्थिक फसवणूक करून त्या रकमेचा अपहार केला.
तसेच आजपर्यंत आरोपी जोशी याला फ्लॅटच्या व्यवहारापोटी दिलेली 21 लाख 40 हजार रुपयांची रक्कम माळी याला परत केलेली नसून, फ्लॅटसुद्धा नावावर करून दिलेला नाही. त्याचप्रमाणे फ्लॅट क्रमांक 3 फिर्यादी माळी यांच्या नावावर करून देण्याच्या बदल्यात आरोपी जोशी याने फिर्यादीला मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी वसूल केली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात प्रशांत जोशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.