
७ ऑगस्ट २०२५
दैनिक भ्रमर (नाशिक प्रतिनिधी) : ऑनलाईन झालेल्या फसवणुकीत सुमारे 20 लाख रुपयांची रक्कम तत्काळ थांबविण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याला यश आले आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एका सायबर भामट्याने कसबे वणी येथील फिर्यादीला अधिक परतावा मिळवून देतो, असे सांगितल्याने या मोहास बळी पडून फिर्यादीने फसवणूक करणार्या इसमाने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये 36 लाख रुपये भरले. या सायबर भामट्याने तयार केलेल्या अॅपमध्ये फिर्यादीला त्याने भरलेल्या रकमेची दुप्पट रक्कम दिसू लागली.
फिर्यादीने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले, की तुम्हाला ही रक्कम काढण्यासाठी टॅक्स भरावा लागेल. त्याकरिता आणखी पैसे भरायला लागतील. तक्रारदारांना फसवणुकीची शंका आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण पोलिसांंनी गोल्डन अवर सायबर मदत संकल्पना सुरू केली असून, त्याचा 7666312112 हा संपर्क आहे. फिर्यादीने या क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात व पोलीस हवालदार प्रमोद जाधव यांनी सायबर क्राईम पोर्टलवर तक्रारदार यांनी भरलेल्या पैशांची तत्काळ माहिती घेऊन तक्रार नोंदविली. ही तक्रार नोंदविल्यानंतर लागलीच तक्रारदाराचे 20 लाख 15 हजार 174 रुपये थांबविण्यात सायबर पोलिसांना यश आले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar