लग्न ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर केक कापून आनंदोत्सव अनेक जण साजरा करतात पण घटस्फोट झाल्यानंतर केक कापून, आणि दुधाने अभिषेक करून आनंद साजरा करणारा हा तरुण कदाचित पहिलाच असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक तरुण आपल्या आईकडून दूधाने अभिषेक घेताना दिसतोय आणि त्यानंतर ‘HAPPY DIVORCE’ असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतोय.

हिंदू संस्कृतीत अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर युवक ‘सुखी घटस्फोट’ असे लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि हसतमुखाने तो केक कापतो. केकवरच त्याने लिहिले होते की, “मी माझ्या माजी पत्नीला १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत.” तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत, घेतले नाहीत. आता मी सिंगल, खुश आणि आजाद आहे. माझं जीवन, माझे नियम!”
या तरूणाच्या व्हिडिओने इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घातला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. काहींनी या कृतीवर टीका केली असली, तरी काहींनी युवकाच्या ‘नव्या सुरुवातीचा’ आनंद साजरा करण्याच्या पद्धतीचे कौतुकही केले आहे. या व्हिडिओला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर युवकाने तो पुन्हा शेअर करत आपल्या समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले. जरी या व्हिडिओवर टीका आणि वेगवेगळ्या चर्चेचा पाऊस पडत असला, तरी त्यानेघटस्फोटानंतरही आयुष्य नव्या दृष्टीने कसं पाहता येऊ शकतं याबाबत एक वेगळा विचार नक्कीच पुढे आणला आहे.