प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी लग्नाच्या 17 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांनी नेहमी त्यांचं खासगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवलं. आपण विभक्त होत असल्याचं जाहीर करण्यापूर्वी त्यांनी जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना याची माहिती दिली होती. भारताच्या शास्त्रीय संगीतात आदराने नाव घेतलं जाणाऱ्या राहुल देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
राहुल देशपांडे यांनी पोस्टमध्ये विभक्त होण्यामागील कारणे सार्वजनिकरित्या उघड केलेली नाहीत. मात्र मुलीच्या भविष्यासाठी एकमेकांप्रती आदर आणि समजूतदारपणा राखण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी कायदेशीर वाद किंवा मतभेद नोंदवलेले नाहीत.
राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही दोघांनी मिळून शांतपणे आणि परिपक्वतेने हा निर्णय घेतला आहे. यात कोणताही वाद किंवा कटुता नाही. आता आम्ही आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा आयुष्याचा एक नवा अध्याय आहे, जो आम्ही धैर्याने आणि आशेने स्वीकारत आहोत.” तसेच त्यांनी चाहत्यांना आणि श्रोत्यांना आवाहन केले आहे की, “या निर्णयाचा सन्मान करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर राखा.
राहुल देशपांडे यांनी पुढे लिहीले, 17 वर्षांच्या संसारानंतर आणि कितीतरी अविस्मरणीय आठवणींनंतर मी आणि नेहाने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये सौहार्दपूर्णरित्या पूर्ण झाले. मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला. जेणेकरून या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल.विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे.