अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी जून महिन्यात बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. सोनाक्षी हिंदू आहे तर झहीर मुस्लीम आहे. यामुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. परंतु सोनाक्षीसुद्धा अशा टीकाकारांना तिच्याच अंदाजात उत्तर देताना पहायला मिळते.
नुकत्याच एका युजरने सोनाक्षीच्या एका फोटोवर तिच्या घटस्फोटाबाबत कमेंट केली. या कमेंटकडे दुर्लक्ष न करता सोनाक्षीने त्याला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलं. संबंधित युजरला तिने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
‘तुझा घटस्फोट तुझ्या खूप जवळ आला आहे’, अशी कमेंट एका युजरने सोनाक्षीच्या फोटोवर केली. त्यावर सोनाक्षीने उत्तर देत लिहिलं, ‘आधी तुझे आई-वडील घटस्फोट घेतील, मग आम्ही. प्रॉमिस (वचन).’ तिच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
सोनाक्षी आणि झहीरने जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्याही आधी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाली होती. परंतु वेळोवेळी तिने टीकाकारांना उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे.