दाक्षिणात्य सिनेविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन झालं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सिनेविश्वात त्यांची 'अभिनय सरस्वती' म्हणून ओळख होती. सरोज यांनी आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
बी. सरोजा यांचा जन्म ७ जानेवारी १९३८ साली बंगळुरू येथे झाला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी महाकवी कालिदास (१९५५) या कन्नड चित्रपटातून आपाल्या करिअरची सुरूवात केली. त्यांनी आपल्या निरागस अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तामिळ,तेलुगू आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी कारकिर्दीत २९ वर्षे १६१ चित्रपटांमध्ये नायिका म्हणून काम केलं आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचा पहिला चित्रपच पैगाम (१९५९) होता. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट तुफान गाजला. प्रेक्षकांना ही जोडी प्रचंड आवडली. विशेष म्हणजे सरोजा देवी यांनी प्रसिद्ध अभिनेते एम.जी रामचंद्रन यांच्यासोबत २६ सुपरहिट चित्रपट दिले आहे. १९६७ साली लग्नानंतरही त्यांनी अभिनय सुरू ठेवला.
बी. सरोजा देवी यांचं केंद्र सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.