मोठी बातमी!  सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, नेमकं काय कारण?
मोठी बातमी! सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, नेमकं काय कारण?
img
Dipali Ghadwaje
साऊथ सुपरस्टार, अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. गेल्या 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनला अटक कऱण्यात आलं आहे.

'पुष्पा 2' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, सुपरस्टार अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अल्लु अर्जुन थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेलं आहे. या प्रकरणासंदर्भात अभिनेत्याची येथे चौकशी केली जाणार आहे.

अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. अभिनेत्याने मृत महिलेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. अभिनेता अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला हे दु:खद असल्याचं अभिनेता म्हणाला. चित्रपटाच्या रिलिजवेळी चित्रपटगृहात येणं साहजिक आहे, असं अल्लू अर्जुन म्हणाला.

याआधीही आपण अनेकदा चित्रपटगृहात आलो आहे, मात्र अशा घटना कधी घडल्या नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. थिएटरजवळ पोहोचण्याआधी आपण थिएटर मॅनेजमेंट आणि ACP ला कळवल्याचं अभिनेता म्हणतो. मी थिएटरमध्ये पोहोचण्यावेळी कोणताही निष्काळजीपणा केला नाही, असं अभिनेत्याचं म्हणणं आहे. माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, असं अल्लु अर्जुन म्हणाला. आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटकेसह तपास प्रक्रियेला स्थगिती देण्याचे अंतरिम आदेश जारी करण्यात यावेत, अशी विनंती त्याने केली.
 






इतर बातम्या
Join Whatsapp Group