मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमीसमोर आली आहे. ज्येष्ठ साऊथ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कोटा श्रीनिवास राव यांचे आज (13 जुलै) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी हैदराबादमधील आपल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला.
कोटा श्रीनिवास राव हे केवळ अभिनेते नसून भाजपाचे माजी आमदार देखील होते. तीन दिवसांपूर्वी (10 जुलै)ला त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोटा श्रीनिवास राव हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
कोटा श्रीनिवास राव यांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले. त्यांनी 700 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. साऊथमधील ते खूप दिग्गज अभिनेते होते. त्यांनी 1978 साली रिलीज झालेल्या 'प्रणाम खरेदू' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या खलनायकाच्या भूमिका खूप गाजल्या. त्यांनी आपल्या अभिनयासाठी खूप पुरस्कार देखील जिंकले आहेत.
कोटा श्रीनिवास राव यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोटा श्रीनिवास यांनी शेवटचे 2023मध्ये रिलीज झालेल्या 'कब्जा' चित्रपटात काम केले.