स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर आता या मालिकेत नव्या मुक्ताची एण्ट्री झाली आहे.
तेजश्रीनंतर यामध्ये मुक्ताची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर मकर संक्रांतीच्या निमित्ताने नवी मुक्ता प्रेक्षकांसमोर आली. अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं मालिकेत तेजश्रीची जागा घेतली आहे.
स्टार प्रवाहच्या मकर संक्रांती विशेष कार्यक्रमात सागर (राज हंचनाळे) आणि नवी मुक्ता (स्वरदा) पहिल्यांदा एकत्र दिसले. या दोघांची जोडी पाहून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या निमित्ताने तेजश्रीने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर काम केलं होतं. यात तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. सागरसोबतची तिची जोडीसुद्धा हिट ठरली होती. मात्र काही कारणास्तव तिने ही मालिका मध्येच सोडली. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. म्हणून तेजश्रीच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘तेजश्री प्रधान नाही तर मालिका खास नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे दोघं एकमेकांना शोभून दिसत नाहीत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तेजश्रीच छान होती पण नवीन कलाकारांचंही स्वागत केलं पाहिजे’, असंही काहींनी लिहिलं आहे.
तेजश्रीने अचानक मालिका का सोडली याचं नेमकं कारण समोर आलं नाही. मात्र मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने लिहिलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली.