‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनावर ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. कॅन्सरवरील उपचार अत्यंत कठीण असून त्यातील किमोथेरेपीदरम्यान सर्व केस गळतात. या परिस्थितीलाही ती धैर्याने सामोरी जातेय. हिना सोशल मीडियाद्वारे सतत तिच्या उपचाराबद्दलची माहिती देत आहे.
त्याचसोबत इतर कॅन्सर पीडितांनाही ती प्रेरणा देतेय. अनेकजण तिच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. मात्र एका अभिनेत्रीने हिनावर याच कारणासाठी टीका केली आहे. हा सगळा पीआर स्टंट असून प्रसिद्धीसाठी ती सर्वकाही वाढवून-चढवून सांगत असल्याची टीका रोजलीन खानने केली.
रोजलीन खानची पोस्ट-
रोजलीनने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय, ‘एका महिलेसाठी सर्वांत मोठं दु:ख म्हणजे किमोथेरपीमुळे केस गमावणं. ही गोष्ट तुम्ही नॉर्मल करू शकता का? प्राणी संग्रहालयातील सिंहीण हिंमत दाखवू शकते का? ती तिसऱ्या स्टेजच्या उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केलाय? गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे.
कारण हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी कॅन्सरचा वापर करणाऱ्या काही जणांना आणि तुला ही गोष्ट माहीत आहे की मेडिकल गैरसमज पसरवण्यासाठी भारतात काही शिक्षा नाही. सोनाली बेंद्रे, लिसा, मनिषा कोईराला यांसारख्या काही सजग अभिनेत्रींनी कधीच इतकी खालची पातळी गाठून लोकांची दिशाभूल केली नव्हती.’
इतक्यावरच न थांबता रोजलीनने आणखी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय, ‘अशा जीवघेण्या आव्हानांना तोंड देणाऱ्या लोकांप्रती तुमची काही सामाजिक जबाबदारी आहे का की तुम्हाला फक्त तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांसाठी कॅन्सरचा वापर करायचा आहे? ती तिच्या कॅन्सरच्या टप्प्याबद्दल योग्य माहिती देत आहे का, याबद्दलची मला खात्री नाही.
ती कधी एमआरएम आणि रेडिएशनच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्ण असल्याबद्दल बोलली आहे का? मी अशा मानसिक आजारी लोकांसाठी फक्त प्रार्थना करू शकते, जे कॅन्सरने ग्रस्त आहेत आणि त्याचा वापर पब्लिसिटी स्टंट म्हणून करत आहेत. चला, कॅन्सर झालंय, न्यूज आहे, चला ती बातमी बनवूया.’ रोजलीनच्या या पोस्टवर अद्याप हिनाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.