मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटाचा प्रीमिअर गुरुवारी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सिनेमाच्या प्रीमिअरला हजेर लावली होती. या चित्रपटाबद्दल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रिये दरम्यान इंदिरा गांधी यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
इंदिरा गांधींबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'इंदिरा गांधींनी देशासाठी चांगलं काम केलं. त्या देशाच्या नेत्या होत्या, पण आणीबाणीच्या काळात त्या आमच्यासाठी व्हिलन होत्या. प्रत्येक काळातील एक गोष्ट असते. मात्र, त्यांनीही देशासाठी खूप चांगलं काम केलं आहे'. दरम्यान देवेंद्र यांनी कंगना रणौतच्या अभिनयाचं कौतुकदेखील केलं.
'जो इतिहास होता, तो इमर्जन्सी चित्रपटात मांडण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांच्या चांगल्या गोष्टी सुद्धा यामध्ये दाखवल्या आहेत. ऐतिहासिक घटनांचा मागोवा यामध्ये दिसतो.
कंगना यांनी प्रभावीपणे अभिनय केलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाला गुंडाळून त्यावेळी ठेवलं होतं, लोकांना जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. माझे वडीलसुद्धा त्यावेळी तुरुंगात होते. १९७१ ची लढाई खूप चांगल्या पद्धतीने या सिनेमात मांडली आहे. इंदिरा गांधी यांचा संपूर्ण जीवनप्रवास यामध्ये दाखवला गेलाय.' असं देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.