‘कोणी जर आम्हाला काम काय केले हे विचारणार असतील. तर‚ त्यांनी एकदा आरसा पाहावा‚ ’अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते‚ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता सोमवारी टीका केली. ‘ते दादा (अजित पवार) बोलत आहेत. हे दादा (चंद्रकांत पाटील) बोलत आहेत. निवडणूक रंगात येत आहे. मात्र आपण जेवढे मागे जावू तेवढे वाढेल‚ असे सांगत फडणवीस यांनी जास्त बोलणेही टाळले.
दरम्यान‚ ‘मुंबई बदलू असे सांगितले तेव्हा‚ मला वेड्यात काढले होते. मात्र‚ मुंबईचा विकास करून दाखविला आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वासही व्यक्त करतानाच शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येतील‚’ अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचारा केल्याचा गंभीर आरोप करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी अजित पवार यांना एकप्रकारे हा वाढ न वाढवण्याचा सूचक संदेश दिला. ते सोमवारी पुण्यातील कात्रज चौकात आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजितदादा म्हणाले की, पिंपरी आणि पुण्यामध्ये विकास झाला नाही, मग अजित दादा अगोदर सत्ता तुमची होती, तेव्हा विकास का केला नाही. अजित पवार अनेक वर्ष सत्तेत असताना आम्हाला प्रश्न विचारतात, पाच वर्षात तुम्ही काय केले? त्यांना अनेक कामांच्या यादी सांगता येतील, अजित दादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल आणि मेट्रो करायला अजित दादा उशीर का झाला? मेट्रो आम्ही आणली, तुमची नुसती कागदावर राहिली. पुण्यात तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत मेट्रो करू शकला नाहीत. तुम्ही आम्हाला विचारता काय केलं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे हे विसरू नका, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.