आज नगरपालिका, नगरपरिषदेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. आज राज्यात विविध ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगली जिल्ह्यांतील ईश्वरपूर येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही महिन्यांपूर्वी रंगली होती. यावरून जयंत पाटील यांना टोला लगावताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘आता मंत्रिमंडळ फुल आहे. सध्या व्हॅकन्सी नाही. एकच गोष्ट सांगतो, माझ्या मंत्रिमंडळात कुठलीही जागा नाही. नव्याने मागण्या करू नका. बाहेरच्याला मंत्रीपद देणार नाही. कोणालाही मंत्री पद मिळणार नाही.’ असे वक्तव्य केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘आधी या देशात राजेशाही होती, राणीच्या पोटातून मुलगा बाहेर आला की तो राजा होत असे, पण आता संविधान आल्यानंतर ती व्यवस्था बदलली, मताच्या पेटीतून आता राजा होतोय. आपल्या देशात गावकेंद्रीत व्यवस्थित होती. 65 वर्षात भारतात केंद्राकडे शहरांच्या विकासाकरिता कोणत्या योजना नव्हत्या.
त्यामुळे देशातल्या शहरांचा विकास होऊ शकला नाही. 2014 नंतर मोदी पंतप्रधान बनले. शहरांचा चित्र बदललं पाहिजे, शहरांमध्ये सोयी दिल्या पाहिजे. त्यामुळे देशात पहिल्यांदा स्मार्ट सिटी अमृत योजना स्वच्छ भारत शहरी योजना अशा वेगवेगळ्या योजना तयार केल्या. लाखो कोटी रुपये निधी मोदी सरकारने शहरांना द्यायला सुरुवात केली.’