बीड : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. सीआयडीचे एकूण नऊ पथक या प्रकरणांमध्ये तपास कामी काम करतात.
आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तर वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी दोन महिलांची देखील काल सीआयडीच्या पथकाने चौकशी केली. आज देखील चौकशीचे हे सत्र सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.
मारहाणीचे चार व्हिडीओही हाती
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओ देखील हाती लागले आहेत. तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. विशेष म्हणजे यामध्ये काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.
आतापर्यंत चार आरोपींना अटक
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेतले होते, तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या. पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत.