बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एकामागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. दुकानावरील पत्रे उडून गेली तर शेजारच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली. ही आग काही वेळातच शेजारील अरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलमध्ये पसरली. आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेटल्याने सलग दोन स्फोट झाले. या स्फोटांच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असल्याने दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीत नेमके किती नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.