किर्गिस्तानमध्ये मोठा हिंसाचार उफाळला आहे. भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ७ पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे भारतीय विद्यार्थी मात्र सुखरूप आहेत. मात्र, या हिंसाचारात महाराष्ट्रातील ५०० विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती आहे. भारत पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर किर्गिस्तानमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील काही विद्यार्थी देखील अडकून पडलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये गेलेले आहेत. सरकारने आमची सुटका करावी, अशी विनवणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
देशात दररोज हिंसाचाराच्या घटना घडत असून विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, परीक्षेनंतर जून महिन्यात किर्गिस्तानमध्ये अडकून पडलेले सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे भारतीय दूतावासाने किर्गिस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचंही सांगण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन संपर्क क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. “आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सध्या परिस्थिती शांत आहे परंतु विद्यार्थ्यांनी घरातच राहावे, तसेच कोणतीही समस्या झाल्यास आम्हाला 0555710041 या क्रमांकावर साधावा" असे किर्गिझमधील भारतीय दूतावासाने सांगितले.