मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत उभी पिकं नष्ट झाली आहे. धाराशिवमध्ये पावसामुळे होत्याचे नव्हते झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे.
पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार विविध भागाच्या पाहणीवर आहे. एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आले आहेत. तात्काळ मदतीची मागणी करत धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना घेरलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आले आहेत. शिंदेंसोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंतही उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा कळंब तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शिंदे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे कळंब तालुक्यातील आथर्डी, भूम तालुक्यातील पाथरूड, परंडा तालुक्यातील रुई या गावात पाहणी करणार आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहचल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले.
नुकसानग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आले आहेत. सरकारी मदतीऐवजी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवर भर देण्यात आल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या या प्रचारावरुन धाराशिवमधील ग्रामस्थ संतापल्याचे देखील दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासून कोणीच आले नाही. आम्हाला तुमची मदत नको, तुमचा टेम्पो घेऊन जा...असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. तर काही नागरिकांनी आमचा संसार पाण्याखाली गेलाय, आम्हाला मदत घेऊ द्या अशी मागणी केली.