पश्चिम बंगाल आणि आसामनंतर आता केरळलाही हवामानाचा तडाखा बसला आहे. केरळमधील अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे किनारी भागातील गावे आणि शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटींचे व लोकांचे मोठे नुकसान होत आहे. कोल्लम शहराची अवस्था सर्वात वाईट आहे. येथे रविवारी (दि.३१) उंच लाटांमुळे घरांमध्ये पाणी शिरले आणि अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. यामुळे केरळमधील किनारी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटरने केरळ किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा दिला आहे. त्यांनी मच्छिमार आणि किनारपट्टीवरील रहिवाशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, त्रिशूर जिल्ह्यांतील किनारपट्टी भागातही परिस्थिती असामान्य होती, असे देखील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
‘आम्ही काल जेवू शकलो नाही. आम्ही सगळे घाबरलो आहोत. आता आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत. ज्यांची घरे पूर्णत: वा अंशत: गेली आहेत, त्यांना या भागातील लोकांसाठी घरे व सुरक्षेसाठी पैसे मिळावेत, अशी आमची सरकारकडे मागणी आहे, अशा भावना केरळ किनापट्टीवरील प्रभावित लोकांनी व्यक्त केली आहे.