वायनाड (भ्रमर वृत्तसेवा) :- मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची घटना केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ घडली. या भूस्खलनात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे डोंगराला तडे गेल्याने मातीचा ढिगारा पाण्यासह खाली आला, ज्याखाली डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. १०० हून अधिक लोक अजूनही ढिगार्याखाली दबले गेल्याची भीती आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भूस्खलनाबाबत माहिती दिली आहे.
भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही बचाव कार्यात एनडीआरएफचे पथक कार्यरत आहेत. कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे पथकही घटनास्थळी उपस्थित आहेत. पहाटे दोनच्या सुमारास लोक झोपेत असतानाच दरड कोसळली. यानंतर चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक ढिगारा खाली आला. दरम्यान आतापर्यंत १६ जणांना वाचवण्यात यश आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूसख्खलनाच्या या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पीडितांना दिलासा दिला आहे. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत मदत कार्याचा आढावा घेतला आहे. वृत्तानुसार, चुरल माला शहरात पूल कोसळल्याने सुमारे ४०० कुटुंबे अडकली आहेत. अनेक लोक जखमी झाले असून अनेक घरे वाहून गेली आहेत. संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधता येत नाही.
केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनासह पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग-राष्ट्रीय आरोग्य अभियानाने नियंत्रण कक्ष उघडला आहे. दरम्यान, हवामान खात्याने केरळमधील मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तासांत धोक्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन तासांत केरळमधील कोल्लम, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.