केरळमधील तिरुवनंतपुरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवरदेवाने हुंड्यात केलेल्या मागण्या कुटुंबीय पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे लग्न मोडलं. या नैराश्येतून वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरने आत्महत्या केली असून या घटनेने केरळमध्ये खळबळ माजली आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, शहाना (वय २६) असे या डॉक्टरचे नाव असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ती शस्त्रक्रिया विभागाची विद्यार्थीनी होती. दरम्यान आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. कुटंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इ. ए. रुवैस या प्रियक्रराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी कुटुंबियांचे जबाब नोंदवले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार डॉ. शहाना तिची आई आणि दोन भावंडांसोबत राहात होती. तिचे वडील आखाती देशात कामाला होते, मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. धक्कादायक म्हणजे शहाना रुवैससौबत रिलेशनशिमध्ये होती आणि अलिकडेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
'प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत'
लग्न ठरल्यानंतर रुवैसच्या कुटुंबियांनी हुंड्यात बीएमडब्ल्यू कार, १५ एकर जमीन आणि तब्बल १५० ग्रॅम सोन्याची मागणी केल्याचा आरोप शहानाच्या कुटुंबियांनी केला आहे. रुवैसच्या कुटुंबियांनी केलेली मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे शहानाच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यामुळे रुवैसच्या कुटुंबियांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यातून हताश झालेल्या शहानाने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने 'प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत' असं लिहिलं आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी घेतली असून राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाला तातडीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पसंख्याक आयोगानेही या प्रकरणात लक्ष घातलं आहे. समितीचे अध्यक्ष ए. ए. रशीत यांनी जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि वैद्यकीय संचालकांनी १४ डिसेंबर रोजी आयोगासमोर हजर राहून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.