अमरावती : महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे, अनेक जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
दुसरीकडे आंध्र प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, नद्यांजवळील गावातील नागरिकांची स्थलांतर करण्यात आले. येथील नागरिकांच्या सेवेत आता सैन्य दलानेही पुढाकार घेतल्याचं दिसून येते.
महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसाच्या कोसळधारांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तब्ब्ल 4 लाख 96 हजार 392 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले असून 11 हजार 497 बागायत हेक्टर पावसानं नासलं आहे. सहा लाखांहून अधिक शेतकरी पावसाच्या पाण्यानं बाधित झाले आहेत.
राज्यातील पूरग्रस्त परिसरात लोकांना जेवण पुरविण्यासाठी सैन्य दलाच्या माध्यमातून अभिनव आणि माणूसकीचं काम केलं जातंय. येथील अनेक भागात ड्रोनद्वारे आणि सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून जेवण पोहोचवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ड्रोनद्वारे जेवण पोहोचविण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. जेथे बोट किंवा हेलिकॉप्टरचा वापर अश्यक आहे, तेथे ड्रोनच्या मदतीने पूरग्रस्तांना अन्न पुरवलं जात आहे.
आंध्र प्रदेशमधील पूरग्रस्त भागात अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा ड्रोनद्वारे करण्यात आला आहे. या ड्रोनद्वारे जवळपास 8 ते 10 किलो वजनाचे साहित्य व पदार्थ पाठवण्यात यश आले आहे. त्यामध्ये, अन्न, पाणी आणि औषधांचा साठा आहे. त्यामुळे, पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथील अधिकाऱ्यांनी या पदार्थांची पाठवणूक करण्यासाठी 15 पेक्षा जास्त ड्रोनची व्यवस्था केली आहे. याबाबत मंत्री लोकेश यांनी माहिती देताना म्हटले की, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी व गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ड्रोनद्वारे अन्न पुरवठा करण्याची ही देशातील पहिलीच वेळ असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, वायू दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानेही पूरग्रस्त भागात मदत पोहोचवली जात आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर जेवण आणि पाणी बॉटलचा पुरवठा हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना करताना दिसून येतात. आत्तापर्यंत 2 लाख 97 हजार 500 नागरिकांसाठी हे अन्न व पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
तसेच, येथील बेघर लोकांसाठी विजयवाडा शहरात पुनर्वसन शिबीरांचे आयोजन करण्यात आलं असून तिथे या सर्वांची सोय केली जात आहे. एनडीआरएफच्या मदतीनेही पूरग्रस्त नागरिकांना अन्न, पाणी पुरवठा केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पुरातग्रस्त भागात 12 जणांचा मृत्यू
दोन दिवसाच्या पावसात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 जालना 2 हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मृत झाला असून कालच्या पावसात ही आकडेवारी वाढून 12 वर गेली आहे.