आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मुलासह अटक
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मुलासह अटक
img
Dipali Ghadwaje
हैदराबाद (भ्रमर वृत्तसेवा) :- आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉर्पेारेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून सीआयडीने त्यांना अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीने याबाबत माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने नायडू यांच्यावर आज पहाटे कारवाई केली. नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना आज पहाटे 3.30 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथील आरके फंक्शन हॉल परिसरात दाखल झाला होता.

चंद्राबाबू नायडू यांनी काल आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केले होते. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. आज पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडी पथकाला चंद्राबाबूंना अटक करण्यास  विरोध केला.

चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्रप्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्यांच्या अटकेसाठी 51सीआरपीसी कलमांतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचे सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे मान्य केले. अखेर पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई केली. 

चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि टीडीपी नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. टीडीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोकेशचा व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ते (लोकेश) चंद्राबाबू नायडूंना भेटू शकत नाही.

कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी 1 म्हणून नाव देण्यात आले आहे, ज्यात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी त्यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचे सांगत तपास अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न देता त्यांना अटक कशी केली जाऊ शकते? असे असले तरी, अटक हा तपास प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असून, 24 तासांत रिमांड रिपोर्टमध्ये सर्व तपशील देण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.



इतर बातम्या
Join Whatsapp Group