आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केली. विशाखापट्टणममधील पीएम पालेम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मधुरावाडा येथे ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , महिला ९ महिन्याची गर्भवती होती. डिलिव्हरीच्या आधीच नवऱ्याने तिची हत्या केली. या घटनेमुळे आंध्रप्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.
अनुषा आणि ज्ञानेश्वर हे पती पत्नी विशाखापट्टणम येथे राहत होते. अनुषा मुळची अनकापल्ले जिल्ह्यातल्या अडुरोडची रहिवासी होती. तर ज्ञानेश्वर विझागमधील दुव्वाडा परिसरात राहत राहतो. दोन वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. दोघांनीही कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. दोघांमध्ये काही घरगुती कारणावरून वाद झाला आणि त्यादरम्यान ज्ञानेश्वरने अनुषाचा गळा दाबून तिची हत्या केली . अनुषा काही आवठड्यातच बाळाला जन्म देणार होती.
ज्ञानेश्वर सागर नगर व्ह्यूपॉईंटजवळ फास्ट-फूड स्टॉल चालवतो. पत्नीच्या हत्येनंतर ज्ञानेश्वरने त्याच्या मित्रांना याबद्दल फोन करून अनुषा बेशुद्ध पडल्याचे सांगितले होते.
त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांनी तिला रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर अनुषाच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत ज्ञानेश्वरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ज्ञानेश्वरला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याने वादानंतर अनुषाची गळा आवळून हत्या केल्याचे कबूल केले.
अनुषाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, ज्ञानेश्वरने यापूर्वी तिला सोडून देण्याचा आणि फसवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी ज्ञानेश्वरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.