पावसाळ्याच्या दिवसात मस्त गरमागरम समोसा खायला कोणाला आवडत नाही...मात्र जर आता तु्म्ही समोसा आणि जिलेबी खात असाल तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणार आहे.
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व केंद्रीय संस्थांमध्ये एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. ज्यानुसार ‘तेल आणि साखरेचं प्रमाण असलेला बोर्ड लावायचा आहे.
काय आहे 'तेल आणि साखर बोर्ड'?
या बोर्डांवर खाद्यपदार्थांमध्ये किती साखर, तेल, ट्रान्स फॅट आहे हे स्पष्ट लिहिलं जाईल. म्हणजे जसं सिगरेटच्या पाकिटांवर ‘धूम्रपान आरोग्यास घातक आहे’ असं लिहिलं असतं. तसंच आता समोसा, वडा-पाव, लाडू, पकोड्यांसारख्या खाद्यपदार्थांसाठीही हा इशारा लावला जाणार आहे.
जर एखाद्या समोशामध्ये किती तेल आहे हे समजलं, तर दुसरा समोसा खाण्याआधी तुम्ही दोनदा विचार कराल का नाही? हे यामागचं उद्धिष्ट आहे.
ट्रान्स फॅट आणि साखर बनलेत नवीन तंबाखू?
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , एम्स नागपूरने यासंबंधीच्या आदेशाची पुष्टी केली आहे. लवकरच त्यांच्या कँटीनमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अशा इशारा देणारे बोर्ड्स लावले जाणार आहेत.
कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अमर अमाले म्हणाले, “सिगरेटसारखी खाद्यपदार्थांवरील लेबलिंग आता गंभीरपणे घ्यावी लागणार आहे. साखर आणि ट्रान्स फॅट हे आता नव्या काळातले ‘तंबाखू’ ठरत आहेत. मुळात लोकांचा हक्क आहे ते खात असलेल्या खाण्यामद्ये काय आहे ते त्यांना माहीत असावं.” सरकार कदाचित फास्ट फूडवर थेट बंदी न आणता, अशा इशारा देणाऱ्या बोर्डांच्या माध्यमातून जनतेला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देणार आहे. म्हणजे आता समोसा खायचा असेल, तर त्याच्याबरोबरच “खा... पण विचारपूर्वक” असा बोर्डसुद्धा दिसण्यात येणार आहे!