३०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त
३०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त
img
DB

सिन्नर (भ्रमर वार्ताहर) :- सिन्नर एमआयडीसीत येथे यशवी मिल्क प्रॉडक्ट्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सुमारे 314 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सिन्नर एमआयडीसी येथे मे. यशवी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस (प्लॉट नं. सी 82, स्टाईस, मुसळगाव एमआयडीसी) या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सखोल तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनविताना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या पदार्थांचा भेसळीसाठी वापर करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा 53 हजार 380 रुपये किमतीचा 314 किलो इतका साठा नमुना घेऊन जप्त केला, तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी भेसळीसाठी वापरात असलेले रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या पदार्थांचा साठा नमुने घेऊन जप्त केला, तसेच  संशयित भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच नष्ट केले.

ही कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न), उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन,  योगेश देशमुख, नमुना सहायक  विकास विसपुते, वाहनचालक  साबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


या प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

food | paneer |
इतर बातम्या
Join Whatsapp Group