ठाणे : सध्या रेल्वेच्या काही विभागांमध्ये ऑडिटचे काम सुरू आहे. पालघर रेल्वे स्थानकामध्ये असणाऱ्या तिकीट कार्यालयामध्ये सुरू असलेल्या कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यासाठी नेमलेल्या महिला अधिकाऱ्याऐवजी त्यांच्या पतीने काम केल्याचा गैरप्रकार उघड झाला आहे. दरम्यान या गैरप्रकारानंतर वरिष्ठांनी या पालघर रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना डमी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकात काही कार्यालयांमध्ये सकाळच्या वेळी फारशी गर्दी नसते. तेव्हा रेल्वे स्थानकातील सेंट्रल बुंकिंग कार्यालयात सकाळी आपण ऑडिटर असल्याचे सांगून एका बाहेरच्या व्यक्तीने प्रवेश केला. त्यानंतर या व्यक्तीने कार्यालयात येऊन सर्व कागदपत्रांची तपासणी केली. मात्र या व्यक्तीच्या वर्तवणुकीवर संशय आल्याने कार्यालयातील कर्मचारी सजग झाले.
त्यानंतर वाणिज्य निरीक्षकांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली. वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिल्यानंतर लेखापरीक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती महिला असल्याची माहिती मिळाली. तर या महिला अधिकाऱ्याच्या ऐवजी पती काम करत असल्याचे निर्दशास आले. त्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालघरच्या स्टेशन व्यवस्थापकाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, ही घटना उघडकीस झाल्यानंतर या महिला अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते आहे. या डमी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले होते. या व्यक्तीला रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरिक करण्यात येईल. त्यासाठी तक्रार दाखल करून प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कळते.