एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या टिप्पर गँगचा म्होरक्या मोठा पठाण यास चाळीसगाव मधुन अटक करत गुंडा विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
फिर्यादी निखील प्रदीप दर्यानाणी यांचे दि. ४ एप्रिल रोजी दुपारच्या वेळी काठेगल्ली सिग्नल येथे त्यांच्या क्रेटा वाहनात दोन अनोळखी इसम बळजबरीने बसुन त्यांना गन दाखवुन मारुन टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली.
त्यानंतर फिर्यादी यांना डिकॅथलॉन मुंबई हायवे येथे घेवुन जावुन आरोपींनी त्यांना त्यांच्या क्रेटा कारमधुन उतरवुन बलेनो कारमध्ये बळजबरीने बसवुन घोटी-कळसुबाई शिखराकडे जाणा-या रोडवर सुनसान जागी घेऊन गेले. नंतर फिर्यादी यांना गाडीच्या खाली उतरवून आरोपीतांनी त्यांचेकडील गनने हवेत व जमिनीवर दोन गोळ्या फायर केल्या व जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांच्या भावाने आरोपीतांच्या साथिदारास खंडणी स्वरुपात १५ लाख रुपये दिले या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्हयातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने व गुन्हयाचे गांभीर्य पाहता सदर गुन्हयात मोक्का कायदयान्वये कलम वाढ करण्यात आली आहे.
या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील मुख्य आरोपी शाकीर पठाण यास तत्काळ अटक करणे बाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने सदर गंभीर स्वरुपातील गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध घेत असतांना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्हयातील आरोपी शाकीर पठाण हा १५ दिवसापुर्वी लोणावळा येथुन कोकण किनारपट्टीवर फिरायला गेला होता.
ही माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदारसह लोणावळा जि. पुणे व कोकण किनारपट्टी या भागात आरोपीताचा शोध घेतला असता आरोपी शाकीर पठाण हा टोयोटा ग्लांझा गाडी वापरत असुन तो संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर दिनांक २५/०७/२०२५ रोजी गुंडा विरोधी पथकाचे विजय सुर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, घनश्याम महाले तत्काळ संभाजीनगर येथे रवाना झाले. संभाजीनगर येथे स्थानिक लोक व गुन्हेगारांकडुन माहिती मिळाली की, शाकीर पठाण हा एका ठिकाणी राहत नसुन तो चाळीसगाव, मालेगाव व संभाजीनगर येथे फिरस्ता असतो.
त्यानुसार मालेगाव, चाळीसगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता दि. २७ जुलै रोजी मध्यरात्री पिर मुसाकादरीबाबा दर्गा, पाटनादेवी रस्ता, चाळीसगाव, जि. जळगाव येथे शाकीर नासीर पठाण उर्फ मोठा पठाण (वय ३५, रा. एन ५१, एस.एफ. १, २२/३ नंदनवन चौक, उत्तमनगर, सिडको, नाशिक) यास त्याच्या ताब्यातील गुन्हयात वापरलेले चारचाकी टोयोटा ग्लांझा वाहन क्रमांक MH 11 DD 2101 सह शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाई साठी नाशिक येथे आणुन मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.