नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- ऑटो कन्सल्टंटसह इतर चौघांची 93 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंटी बबलीवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय शांतीलाल पाटणी (वय 52, रा. रेखा चेंबर, गंजमाळ, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांना इंदिरानगर परिसरात घर घ्यायचे होते. त्यांची मानलेली बहीण कमोदनगर परिसरात राहत असल्याने तेथे त्यांचे नियमित येणे-जाणे होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारी ऐश्वर्या रवी गायकवाड (रा. फ्लॅट नंबर 3, भक्तीसंगम अपार्टमेंट, डेक्कन पेट्रोल पंपाच्या मागे, इंदिरानगर) हिच्याशी त्यांची ओळख झाली.
सन 2022 मध्ये त्यांनी आरोपी ऐश्वर्या गायकवाडला घर घेण्याबाबत सांगितले होते. तिने तिचा नातेवाईक असलेला दीपक दत्तात्रय देवळे (रा. फ्लॅट नंबर 1, गजरा पार्क, कमोदनगर, इंदिरानगर, नाशिक) याच्याशी ओळख करून दिली. पैशाची अडचण सांगत दीपक देवळेने पाटणी यांना कमोदनगर येथील फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले. पाटणी यांना घर घ्यायचे असल्याने त्यांनी देवळेचा फ्लॅट पाहिला असता त्यांना तो पसंत पडला. त्या बदल्यात 49 लाख 90 हजार रुपयांमध्ये हा फ्लॅट घेण्याचे ठरले.
फ्लॅट घेण्यासाठी पाटणी यांनी पिरॅमल फायनान्स लि. कडून पाच लाख, टाटा कॅपिटलकडून पाच लाख, आयआयएफएल फायनान्सकडून सात लाख, अर्थमेट फायनान्सकडून दहा लाख असे एकूण 25 लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यापैकी त्यांनी दीपक देवळेला 9 लाख 58 हजार रुपये त्याच्या टीजेएसबी बँकेच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाईन ट्रान्स्फर केले. त्याचबरोबर पाटणी यांनी ऐश्वर्या गायकवाडकडे दीपक देवळेला देण्यासाठी 9 लाख 74 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. हे पैसे मिळाल्याचे देवळे याने पाटणी यांना कळविले होते.
नंतर देवळेने पाटणी यांच्या एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डावरून 7 लाख 68 हजार रुपये वापरले. दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी पाटणी यांनी त्यांच्या मित्राच्या बँक खात्यातून पुन्हा देवळेला 1 लाख 20 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले. असे एकूण 28 लाख 20 हजार रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात देवळेने स्वीकारलेले होते. दीपक देवळेला उर्वरित रक्कम द्यायची असल्याने गृहकर्ज करण्यासाठी पाटणी यांनी देवळेला फ्लॅट खरेदी करून देण्याबाबत सांगितले.
त्यावेळी देवळेने पाटणी यांना उडवाउडवीची उत्तरे देत काही काळानंतर त्या मिळकतीचा कच्चा साठेखत करारनाम्याचा मसूदा तयार करून त्यावर सह्या करून घेतल्या. काही दिवसांनी पाटणी यांना समजले, की दीपक देवळेने हा फ्लॅट परस्पर दुसर्याला खरेदी करून दिला. म्हणून त्याने देवळेकडे दिलेल्या पैशाची मागणी केली. तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकीन, असे देवळेने सांगितल्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
बरेच दिवस होऊनही देवळेने पैसे परत न केल्याने पाटणी यांनी वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी दीपक देवळेने पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. दरम्यानच्या काळात पाटणी यांना समजले, की ऐश्वर्या गायकवाड हिने रोहिणी खैरनार यांच्याकडून सात लाख दहा हजार रुपये, रेखा मोहिते यांच्याकडून सात लाख 70 हजार रुपये, पद्मिनी वारे व भूषण वारे यांच्याकडून 47 लाख 13 हजार 74 रुपये व धरमवीरसिंग किर यांच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये असे एकूण 64 लाख 43 हजार 74 रुपयांची फसवणूक करून त्यांचा अपहार केल्याचे समजले.
अशा प्रकारे या बंटी-बबलीने एकूण 92 लाख 63 हजार 74 रुपयांचा अपहार करून या पाचही जणांची फसवणूक केल्याचे पुढे आले. या प्रकरणी दोघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.