सतत होणार्या भांडणाच्या रागातून मुलानेच आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अश्वमेधनगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित महिला या दिंडोरी रोड परिसरात राहतात. त्यांचे व त्यांच्या पहिल्या नवर्याच्या मुलाचे नेहमी वाद होत असत. या वादाचा राग मनात धरून दि. 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्या 22 वर्षीय मुलाने आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर आरोपी मुलगा व त्याचा मित्र घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत महिला 30 ते 40 टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून मुलगा व त्याच्या मित्राविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रायकर करीत आहेत.