अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरे टोळीवर मोक्का
अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरे टोळीवर मोक्का
img
Prashant Nirantar

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अंबड, इंदिरानगर, गंगापूर, मुंबई नाका परिसरात अनेक ठिकाणी प्लॉट व शेती खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारीसाठी लाखो रुपये घेऊन संबंधिताला परतफेडीस टाळाटाळ, अशी अनेक प्रकरणे नावावर असलेल्या अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरे टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीविरुद्ध नाशिकमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल असून, यापुढेही अवैध सावकारी करणाऱ्यांची माहिती घेऊन अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी अशा तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.


याबाबत माहिती अशी, की वैभव देवरे टोळीतील मुख्य आरोपी व टोळीप्रमुख वैभव यादवराव देवरे याने त्याच्या टोळीतील सदस्य गोविंद पांडुरंग ससाणे, सोनल वैभव देवरे, निखिल नामदेव पवार यांनी हिरावाडीतील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याची भासविली, तसेच हिरावाडी व मौजे सारूळ येथील जमिनीचा व्यवहार 3 कोटी 5 लाख रुपयांमध्ये ठरवून त्यापैकी 63 लाख 49 हजार रुपये संबंधित व्यक्ती (फिर्यादी) कडून घेतले.

मात्र दोन्हीपैकी एकही जमीन त्याच्या नावावर केली नाही, तसेच व्यवहारापोटी दिलेले पैसे फिर्यादीने मागितले असता परतफेडीस टाळाटाळ केली, तसेच या फिर्यादीकडून अवैध सावकारी व्यवसायासाठी 35 लाख रुपये बळजबरीने घेतले; मात्र फिर्यादीने पैसे परत मागताच आरोपींनी फिर्यादीस विनयभंगाची खोटी तक्रार करू व जिवे ठार मारू, अशी धमकी देऊन आणखी पैसे वसूल केले, अशी तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल होती.

या गुन्ह्याच्या तपासात आढळून आले, की मुख्य आरोपी व टोळीचा सूत्रधार वैभव यादवराव देवरे याने गोविंद पांडुरंग ससाणे, सोनल वैभव देवरे व निखिल नामदेव पवार यांनी संघटितरीत्या आर्थिक फायद्याकरिता गुन्हेगारी टोळीच निर्माण केली आहे. ही टोळी प्लॉट व शेती खरेदी-विक्रीत संबंधितांची फसवणूक करीत असे, तसेच अवैध सावकारी करताना अवास्तव दराने व्याज लावून रक्कम वसुलीसाठी दमदाटी, जिवे मारण्याची धमकी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी आदी प्रकारांचा अवलंब करून परिसरात दहशत निर्माण करीत होते.

अशा प्रकारे या टोळीविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. हा प्रकार संघटित गुन्हेगारीचा असल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1991 कलम 3 (1), 3 (2), 3 (4), 3 (5) ही वाढीव कलमे लावून या टोळीविरुद्ध मोक्का तरतुदी लागू करून पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group