नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पतीने घरच्या लोकांच्या मदतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मयत पूजा वैभव आहेर (वय - २५) हिचा विवाह वैभव मोहनदास आहेर याच्याशी झाला होता. लग्न झाल्याच्या तीन-चार महिन्यांनंतर तिला सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तसेच तिला मूलबाळ होत नाही, या कारणातून तिचा छळ करून मारहाण करत धारदार शस्त्राने तिला जखमी केले. रक्तस्राव जास्त झाल्याने व घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
झालेली घटना कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून आरोपींनी त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतातील विहिरीमध्ये तिचा मृतदेह ढकलून दिला. या प्रकरणी तिचा भाऊ अभिजित कैलास गवळी (वय 23) याच्या फिर्यादीवरून पती वैभव मोहनदास आहेर, सासरा मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई ऊर्फ लताबाई मोहनदास आहेर, भाया केशव मोहनदास आहेर व जाऊ रूपाली केशव आहेर यांच्याविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, रूपाली आहेरला अद्याप अटक केलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.