नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मागणी रक्कम कमी असताना ती जास्त दाखवून अधिकार्याने बँकेची सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांनी गंगापूर रोडवरील थत्तेनगरमधील अॅग्री हायटेक शाखा बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेची जोखीम आधारे अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात आले. त्या लेखापरीक्षणात अॅग्री हायटेक शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, थत्तेनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी आरोपी सुभाष विठ्ठल कौटे (वय 40, रा. जवळेबाळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हे बँकेत कार्यरत होते. कौटे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून एकूण 36 खातेदारांची कर्जप्रकरणे मंजूर करताना खातेदारांशी संगनमत केले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे खातेदारांकडून कर्जाची मागणी रक्कम कमी असतानासुद्धा ती रक्कम जास्त असल्याचे दाखविले, तसेच काहींचे कर्जखाते नसतानासुद्धा कर्जखाते असल्याचे भासविले. त्याचप्रमाणे त्या कर्जावर अनुदानाची रक्कम मंजूर करून ती कर्जदारांच्या बचत खात्यांवर वर्ग करून एकूण 5 कोटी 55 लाख 66 हजार 513 रुपयांचा अपहार करून बँकेची व शासनाची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 10 जानेवारी 2023 ते 25 जुलै 2024 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या थत्तेनगर येथील अॅग्री हायटेक शाखेत घडला.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तत्कालीन शाखा मॅनेजर सुभाष कौटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.