नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा ते पावणेसहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी हिरालाल नंदलाल कुरील यांच्या बंद घराच्या मागच्या बाजूची भिंत फोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये रोख, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची सटवाई व ओम्पान, एक ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी, 25 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, 12 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा वेल, एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळी, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट, 15 ग्रॅम वजनाची चांदीची नाणी, 20 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण 3 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
तर दुसरीकडे सराफी दुकान व बंद घर फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : सराफी दुकानाचे शटर उचकाटून, तसेच बंद घराचा कडीकोयंडा तोडून पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना अमृतधाम परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की उमेश किरण विसपुते यांचे अमृतधाम परिसरात धनवृद्धी ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. दि. 20 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ते दुकान वाढवून रात्री सव्वानऊ वाजता घरी गेले होते.
दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकाटलेले दिसले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानातील 40 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सहा नग सोन्याच्या मंगळसूत्र वाटीच्या जोड्या, 90 हजार रुपये किमतीचे 18 ग्रॅम वजनाचे एकूण सहा गोल्ड कॉईन, 34 हजार रुपये किमतीचे प्रत्येकी एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॉलिश केलेले 34 दागिने, 18 हजार रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम वजनाचे 40 चांदीचे कडे व 40 चांदीचे ब्रेसलेट असे एकूण 1 लाख 82 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
दुसर्या घटनेत श्री प्लाझा बिल्डिंगमध्ये राहणारे नितीन विश्वनाथ आलापुरे यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून 25 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा वेढा, तसेच 60 हजार रुपये रोख चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करीत आहेत.