अनेकदा रेल्वे प्रशासनाचे बेजबाबदार कारभार अनेकदा उघडकीस आलेले आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे ५२ वर्षीय महिलेचा हात मोडला. त्यानंतर त्या तक्रार दाखल करण्यासाठी जीआरपीकडे गेल्या. परंतु त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर रात्रभर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. सकाळी माध्यमांपर्यंत ही बातमी गेली. त्यानंतर १७ तासांनी महिलेची तक्रार घेण्यात आली.
कल्याण आंबिवली येथील इंदू महादेव पगारे (५२) यांचा कुर्ला स्थानकात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हात मोडला. कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर लादी बसवण्याचे काम सुरू आहे. परंतु कोणतीही बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी नाही. त्यामुळे इंदू पगारे यांचा तोल जाऊन त्या पडल्या. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले. कुर्ला जीआरपी पोलिसांनी त्यांना सुरुवातीला जवळच्या बाबा हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु उपचारांची सोय नसल्याने त्यांना केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इंदू पगारे आणि त्यांचे पती महादेव पगारे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता जीआरपी ठाण्यात गेले. परंतु त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे सायंकाळपासून कुर्ला रेल्वे जीआरपी पोलीस ठाण्याबाहेर रात्रभर ठिय्या सुरु केले. 17 तास झाले तरी देखील त्यांची तक्रार घेण्यात आली नाही.
इंदू पगारे यांच्या आंदोलनाची बातमी माध्यमांच्या प्रतिनिधींना कळाली. त्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी आल्यावर तक्रार घेतली जात आहे. इंदू पगार यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपासून मी या पोलीस स्टेशनच्या आवारात बसून होते. मला काही पोलिसांनी अरेरावी देखील केली आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री व तसेच सीपी साहेबांना तक्रार दाखल करणार आहे. माझ्या घरात मीच एकटी कमवती आहे. मला आता एक वर्ष हात हलवता येणार नाही. माझे घर कसे चालणार?
दरम्यान, कुर्ला लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले की, तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया असते. ती सुरु आहे. आमचा कोणताही पोलीस कर्मचारी उलट बोलला असेल तर त्या संदर्भात आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू.