मोठी कारवाई : रेल्वे स्थानकात नायजेरियन महिलेला 36 कोटींच्या कोकेनसह अटक
मोठी कारवाई : रेल्वे स्थानकात नायजेरियन महिलेला 36 कोटींच्या कोकेनसह अटक
img
Dipali Ghadwaje
मुंबई : एनसीबी बंगळुरू आणि आरपीएफ मुंबई यांच्या संयुक्त कारवाईत पनवेल रेल्वे स्थानकावर तब्बल 36 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका विदेशी महिलेला अटक करण्यात आलीय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,  रेल्वे क्रमांक 12618 'मंगला एक्सप्रेस'मध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह प्रवासी येत असल्याची माहिती एनसीबी बंगळूरूला मिळाली होती. गाडी पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येताच पथकान तातडीनं शोध मोहीम सुरू केली.

या शोध मोहिमेदरम्यान, कोच ए-2, सीट क्रमांक 27 वर एका बाळासह आणि बहुरंगी ट्रॅव्हल बॅग घेऊन जाणारी एक नायजेरियन महिला आढळली. चौकशीत तिनं स्वतःची ओळख एटुमुदोन डोरिस अशी करून दिली.

या महिलेकडे A06895991 क्रमांकाचा नायजेरियन पासपोर्ट होता. या महिलेसोबत एक लहान मुलही होतं. या महिलेनं तिचं नाव 'मिरॅकल' असल्याचं पोलिसांना सांगितल. तसेच ते मूल आपलंच असल्याचही तिनं पोलिसांना सांगितलं.

या महिलेला मूल आणि तिच्या सामानासोबत आरपीएफ पोस्ट पनवेल इथ पुढील चौकशीकरता आणण्यात आलं. तिथ तिच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्या बहुरंगी ट्रॅव्हल बॅगमध्ये अधिकाऱ्यांना 'व्हिंटेज' असं लेबल असलेल्या रबर मटेरियलमध्ये गुंडाळलेले दोन आयताकृती काळे पॅकेजेस आढळले. ते उघडून पाहिल्यावर त्यात पांढऱ्या पावडरची दोन पॅकेट बाहेर दिसून आली. ड्रग डिटेक्शन किट वापरून तपासणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचं स्पष्ट झालं.

तब्बल 2.002 किलो कोकेन या महिलेकडून हस्तगत करण्यात आलं आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 36 कोटी रूपये इतकी आहे.

याप्रकरणी अटक केलेल्या महिलेविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group