थायलंडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका धावत्या रेल्वेवर क्रेन पडल्याने आज (बुधवार) सकाळी झालेल्या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. थायलंड मधील सिखिओ जिल्ह्यात हा अपघात झाला. हाय स्पीड रेल्वे लाइनचे काम सुरू असताना बांधकाम क्रेन एका रेल्वेवर कोसळली.
माहितीनुसार, ही ट्रेन थायलंडची राजधानी बँकॉकहून उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. सकाळी ९:०५ च्या सुमारास सिखियो जिल्ह्यातील बान थानोन कोद जवळ ही घटना घडली. येथे चिनी बनावटीच्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होते. ट्रेन जात असताना अचानक पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन थेट रेल्वेच्या डब्यांवर कोसळली.
क्रेन कोसळल्यामुळे रेल्वेचे डबे एकमेकांवर आदळले आणि काही डब्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात घबराट पसरली होती. अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकून पडले होते. बचाव पथकांनी हायड्रोलिक कटरचा वापर करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.