अयोध्यत राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण अयोध्या नगरीला छावणीचं स्वरुप आले आहे. येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त आतुर आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातून अयोध्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातून अयोध्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अयोध्याला जाण्यासाठी रेल्वेगाड्या सोडा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली असून पुण्यातून अयोध्यासाठी ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येईल.
दोन दिवसाला एक गाडी असं नियोजन करण्यात आलं आहे. या सर्व विशेष रेल्वेगाड्या स्लीपर कोचच्या असणार आहेत. यामध्ये प्रवाशांना सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या रेल्वेगाड्यांसाठी तिकीटांचे बुकिंग कधीपासून सुरू होणार, याची माहिती अद्यापही रेल्वे प्रशासनाने दिली नाही. मात्र, लवकरच बुकिंग सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.
पुण्यातून अयोध्याला सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचा प्रतिसाद पाहून पुढे विशेष गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असंही रेल्वेकडून सांगण्यात आळं आहे. दुसरीकडे कोल्हापूरहून देखील अयोध्यासाठी विशेष गाडी सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.