नागपूर : नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सातवर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण रुग्णालयात मृ्त्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने गर्दीच्या वेळी स्थानकावर एकच खळबळ उडाली.
काय घडलं नेमकं?
नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर ऐन गर्दीच्यावेळी एक मनोरुग्ण हातात लाकडी राफटर घेऊन स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करत सुटला. रेल्वे रुळाच्या कामासाठी वापरात येणाऱ्या लाकडी राफ्टरने लोकांवर तो हल्ले करत होता. अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकावर एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळू लागली. आरोपीने चार लोकांवर हल्ला केला. यात अतिरक्तस्त्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. आरोपी हल्ला करुन पळत असताना रेल्वे कर्मचाऱअयांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम केवट असं आरोपीचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय. याबाबत नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.