मुंबई : मुंबईत वारंवार मराठी माणसांचा अवमान करणारे प्रकार घडल्याचे समोर येत आहेत. त्यात मराठी माणसाला नोकरी नाकारणे, मराठी माणसाला घर नाकारणे यासारखे प्रकार उघडकीस आले. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेचा अवमान होणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला, अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचार्याने केल्याच्या प्रकार समोर आला आहे. अमोल माने या प्रवाश्याशी हा संपूर्ण प्रकार घडला असून मराठी एकीकरण समितीने यात हस्तक्षेप करत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल माने हे नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले. मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोला, असे अमोल माने यांना सांगितले. मात्र मी मराठीतच बोलणार, असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली.
दरम्यान, याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाचा एक व्हिडिओ मराठी एकीकरण समितीने त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत समोर आणला. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आता मराठी एकीकरण समिती ने केली आहे.