दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आता मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये धावत्या ऑटो रिक्षात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धारदार वस्तूने धमकावून तिचा विनयभंग करण्यात आला.
सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास १६ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. एसव्ही रोडवरील बोस्टन हॉटेलजवळ आरोपी अफाक खान याने जबरदस्तीने रिक्षा थांबवली आणि रिक्षा चालक नाही म्हणत असतानाही तो त्या रिक्षामध्ये बसला. रिक्षा मध्ये बसताच अफाकने थोडं पुढे उतरायचं असल्याचं खोटं कारण सांगून रिक्षाचालकाला रिक्षा सिग्नलच्या पुढे घेऊन जाण्यास भाग पाडले. आरोपी अफाक खान हा विद्यार्थिनीसाठी अनोळखी होता. ती ही काही प्रमाणात घाबरली होती.
रिक्षा सिग्नलच्या पुढे जाताच आरोपीने विद्यार्थिनीला आणि रिक्षाचालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर विनयभंग केला. पुढच्या सिग्नलवर रिक्षा थांबताच आरोपीने रिक्षातून पळ काढला . घाबरलेल्या पीडितेने मात्र कॉलेजला जाण्याऐवजी घरचा रस्ता गाठला. पीडितेने घडलेली घटना कुटुंबाला सांगितली असून कुटुंबीयांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.