मुंबईधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगचेंगरी झाली आहे. वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 वर ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. वांद्रे टर्मिन्सवर सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यातील बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जात होते.
वांद्रे रेल्वे स्थानकाीतल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वेत चढत असतानाच गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले.
दरम्यान , भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमी झालेले प्रवाशी साधारण 18 ते 30 वयोगटातील आहेत. यातील इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर तात्काळ पोलीस प्रशासनासह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ही दुर्घटना घडल्यानंतर काही काळासाठी हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामी करण्यात आला आहे. आता सध्या वांद्रे टर्मिन्समध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.