मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) : मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देऊन अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील 50 वर्षीय शेतकर्यासह मुंबईसह सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीतील रहिवासी असलेले अनिलकुमार गाँजारी (वय 50) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची ओळख माया चव्हाण (वय 59) हिच्याशी जून 2024 मध्ये नातेवाइकांमार्फत झाली. संबंधित महिला मुंबई महापालिका (एल. वॉर्ड, कुर्ला) येथे कार्यरत असल्याचे सांगत होती. तिने पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांशी ओळख असल्याचा दावा करत विविध पदांसाठी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.
तक्रारीनुसार, शिपाई, लिपिक, आर. ए. लिपिक व हेड क्लार्क पदांसाठी 1.70 लाख ते 2.50 लाख रुपये घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. सुरुवातीला फॉर्म फीच्या नावाखाली रक्कम घेतल्यानंतर उमेदवारांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घाटकोपर पूर्व येथील एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराकडून 10 हजार रुपये रोख स्वरूपात घेण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने सांगितले की, ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान विविध बँक खात्यांवर ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे 24 लाख 68 हजार पाठविण्यात आले. तसेच मुंबईत प्रत्यक्ष भेटीदरम्यान 8 लाख 30 हजार रुपये रोख दिले.
संबंधित महिला प्रत्यक्षात महानगरपालिकेत केवळ शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. इतर आरोपींनीही बनावट ओळखपत्रे व शिक्के वापरून स्वतःला अधिकारी म्हणून भासविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तीन कर्मचार्यांसह इतरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यातील सुमारे 43 उमेदवारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित आरोपींनी स्टॅम्प पेपरवर रक्कम परत करण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र मुदतीनंतरही पैसे परत न दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुर्ला पोलीस ठाण्याकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चव्हाण ही महिला सेवानिवृत्त झाली असल्याची माहितीही तक्रारदार यांना मिळाली असल्याचे समजते.