मुंबईत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधान भवनात नुतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच संबोधन केलं. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बोलताना महाराष्ट्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या योजना राबवत आहोत याची माहिती दिली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली. विधानपरिषदेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या, लवकर जा, ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या ?
मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Come early Go early याची घोषणा करत आहोत. त्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9.15 वाजता कार्यालयात आल्या तर घरी जाताना त्यांना अर्धा तास लवकर सोडण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सरकारने लाडकी बहीण, लेक लाडकी, अन्नपूर्णा सारख्या योजना आपण आणल्या आहेत. मेट्रोमनी साईड वरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी देखील कायदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील. लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील 17 हजार अंगणवाडीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली.
सुनेत्रा पवार यांनी मोठी घोषणा करत केंद्राच्या धरतीवर राज्यातील महिलांना देखील १८० दिवसांची प्रसुती रजा देण्यात येईल असं जाहीर केलं. तसेच त्यांनी शेतकरी महिलांसाठी लवकरच धोरण तयार करण्यात येईल अशी माहिती दिली. त्यांनी शक्ती कायदा लवकरात लवकर संमत व्हावा यासाठी शासन दरबारी आग्रही राहणार असल्याचं देखील सांगितलं.