नवी मुंबईतील सोसायटीमध्ये एका इसमाने तब्बल 5 वर्ष स्वतःला घरातच कोंडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भीतीमुळे स्वत:ला पाच वर्षांपासून घरात कोंडून घेतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल नेरे मधील शिल आश्रमाच्या सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं.
अनुप नायर असे 55 वर्षांच्या इसमाचे नाव असून तो नवी मुंबईतील जुईंनगर मधील घरकुल सोसायटी राहत होता. 2020 मध्ये त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं, त्यानंतर काही कालावधीतच भावाचा मृत्यू झाला. घरातील तिन्ही सदस्यांचा एकामागोमाग मृत्यू झाल्याने नायर हे तणावाखाली गेले. त्यामुळे त्यांनी 2020 ते 2025 अशी 5 वर्ष स्वतःला घरामध्येच कोंडून घेतलं.
याचवेळी मधल्या काळात एल आई सी एजंट आसलेल्या एका महिलेने त्याला कुणालाही भेटला तर तुला मारून टाकतील आणि तुझी संपती हडप करतील अशा प्रकारची फसवी बाब सांगून त्याच्या नावावर असलेल्या संपत्तीवर वारसदार म्हणून स्वतःचे नाव नोंदवल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला.
आपल्याला मारतील आणि संपत्ती हडप करतील या भीतीने नायर याने स्वतःला कोंडून घेतले, याच कालावधीत त्याने हॉटेल मधून जेवणाच्या ऑर्डर दिल्या, पण त्याचा कचरा काढला नाही आणि कपडेही धुतले नाहीत.
ते घराबाहेर पडत नाहीत, कोणाशी बोलत नाही, घरातील कचराही बाहेर ठेवत नाही हे पाहिल्यावर शेजारील व्यक्तीला संशय आला आणि त्यांनी शील आश्रमातील लोकांच्या कानावर ही गोष्ट घातली. अखेर कार्यकर्त्यांनी सोसायटीतील त्याच्या घरात जाऊन त्याला बाहेर काढून आश्रमात नेले.
तसेच स्थानिक पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कोंडून घेतलेली व्यक्ती, नायर यांची आरोग्य स्थिती स्थिर असल्याचे आश्रमाच्या सदस्यांनी सांगितले. मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.