आठवड्याभरापूर्वी बेलापूर येथे गुगल मॅपचा वापर केल्याने एक महिला खाडीत पडली होती. तिचा थोडक्यात जीव वाचला होता. गूगल मॅपने आपल्याला चुकीचा रस्ता दाखवल्याचे या महिलेने सांगितले होते. कारसोबत ही महिला खाडीमध्ये पडली होती. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि तात्काळ मदत करत महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आाली. २५ जुलैच्या पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर रस्ता दाखवल्याने तिने पुलावरून न जाता ती खालच्या रस्त्याने गेली आणि थेट खाडीत कोसळली.
आता या घटनेवर गुगलने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर दाखवलेला मार्ग हा नेव्हिगेशनसाठी मॅप केलेला नव्हता. "आम्ही स्पष्ट करतो की पुलाखालचा रस्ता गुगल मॅप्समध्ये नेव्हिगेशनसाठी मॅप केलेला नाही आणि आमच्या तपासातून स्पष्ट होते की मॅप्सने त्यावरून जाण्याचा मार्ग सुचवला नव्हता," असं गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले."या भागात गुगल मॅप्सद्वारे दाखवलेला एकमेव मार्ग म्हणजे पनवेल खाडीवरील बेलापूर पूल. आम्ही सुरक्षितता आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन गुगल मॅप्स तयार केले आहेत आणि आम्ही सर्वत्र लोकांना उच्च दर्जाचा नेव्हिगेशन अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत राहू," असं गुगलच्या प्रवक्त्याने टेलिग्रामला सांगितले.