पूर्वी नवीन ठिकाणी जायचे असल्यास रस्त्यात जो भेटेल त्यांना पत्ता विचारायचो आणि त्यानंतर हव्या त्या ठिकाणी पोहोचायचो. काळ बदलला माणसं बदलली. आता आपण डिजिटल झालो. हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचायचे असल्यास आता गूगल मॅपचा वापर आपण करायला लागलो. पण कधी कधी याच गूगल मॅपमुळे चुकीच्या ठिकाणी पोहोचल्याची, वाहनांचे अपघात झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. नवी मुंबईत असेच एक प्रकरण समोर आले आहे. गूगल मॅपचा वापर करणं एका महिलेला चांगलंच भोवलंय.
नवी मुंबईत एक महिला तिच्या कारमधून प्रवास करत उलवेच्या दिशेने चालली होती. मात्र बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग घेतला. यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्या महिलेला वाटले. यामुळे सरळ जात असताना महिलेची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीमधील पाण्यामध्ये पडली. शुक्रवारी मध्यरात्री (शुक्रवारी पहाटे 1 वाजता) ही घटना घडली आहे.
सुदैवाने ही घटना घडली त्या परिसराच्या जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात ही बाब आली. महिलेस गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात आला. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली. गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळल्याने हा अपघात घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान सागरी सुरक्षा पोलिस चौकीच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळाली आणि महिलेचे प्राण वाचले.